बिदालचे २०० जण झटतायेत इतर गावांच्या कल्याणासाठी : वॉटर कप स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:12 IST2018-04-16T21:12:16+5:302018-04-16T21:12:16+5:30
दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील बिदाल गावाने गेल्यावर्षी वॉटरकप स्पर्धेत राज्यपातळीवर चांगली कामगिरी केली. बक्षीस पात्र ठरल्याने गावाला आताच्या स्पर्धेत भाग घेता येत नसला

बिदालचे २०० जण झटतायेत इतर गावांच्या कल्याणासाठी : वॉटर कप स्पर्धा
दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील बिदाल गावाने गेल्यावर्षी वॉटरकप स्पर्धेत राज्यपातळीवर चांगली कामगिरी केली. बक्षीस पात्र ठरल्याने गावाला आताच्या स्पर्धेत भाग घेता येत नसला तरी अनुभवाचा फायदा इतर गावांना द्यावा, ही भूमिका बिदालने घेतली आहे. त्यासाठी गावातील सुमारे २०० लोकांनी यासाठी वाहून घेतले असून, विविध गावांत जाऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत.
तालुक्यात सुरुवातीच्या काळात वॉटर कपसाठी ग्रामसभा घ्याव्या लागल्या. त्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, पाणी फाउंडेशनचे समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतार यांनी चांगले काम केले. त्यास आयपीएस अधिकारी प्रवीण इंगवले, आरटीओ गजानन ठोंबरे यांनी मुंबई व इतर ठिकाणी जनजागृती केली, तर तालुक्यात अशोक इंगवले, सुरेश जगदाळे, अप्पा देशमुख, किशोर इंगवले, हणमंत जगदाळे, सागर जगदाळे आदी मंडळींनीही जबाबदारी पार पाडली. गावातील काही तरुण प्रतिष्ठितांच्या मार्गदर्शनाखाली रोज एका गावात श्रमदान करण्यासाठी जात आहेत.
दोन गावे दत्तक...
कळसकरवाडी व गाडेवाडी ही माणगंगा नदीचा उगम असणारी ऐतिहासिक गावे आहेत. येथे कोणीही अधिकारी नाही म्हणून ही दोन गावे आयपीएस प्रवीण इंगवले यांनी दत्तक घेतली आहेत, तर याच गावात निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी धनंजय जगदाळे यांनी श्रमदान करून साडेपाच हजारांची देणगी दिली.